कराड : काॅंग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेला देशभरात अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी ठरल्याचे अगदी विरोधकही मान्य करीत आहेत. त्यामुळे देशातील आणि राज्यातील राजकीय वातावरण बदलू शकते हे नुकत्याच झालेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीतून दिसून आला आहे. याच भारत जोडो यात्रेसाठी आता राज्यातील काँग्रेसचे आमदार मैदानात उतरले असून आपापल्या मतदारसंघात जनसंपर्क अभियान राबवत आहे. कोपर्डी हवेली येथील नागरिकाची संवाद साधून माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी नागरिकांच्या भेटी घेत भारत जोडोच्या माध्यमातून संवाद साधला.

देशभर झालेल्या भारत जोडो यात्रेमुळे जिल्हा जिल्ह्यात काॅंग्रेसला खरेच गतवैभव मिळू शकते का? हा खरा प्रश्न आहे. जिल्ह्यातील नेत्यांना सर्वसामान्य कार्यकर्त्यांसोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळवावी लागणार आहे. या बरोबरच गटातटात विभागलेल्या पक्षाला एकसंघपणे उभे राहावे लागणार आहे. हेच आता जिल्हा काॅंग्रेसपुढे खरे आव्हान आहे. कराड तालुक्यात हाथ से हाथ जोडो अभियानाचा शुभारंभ चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून कराड शहराला दुसरे मुख्यमंत्री लाभले होते. पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोट्यावधीचा निधी आणून कराड शहराचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळे कराड उत्तर व कराड दक्षिण या दोन्हीही मतदारसंघात काँग्रेसचे बळ वाढवण्याची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती आहे. पृथ्वीराज चव्हाण हे सामान्य कार्यकर्त्यांशी जोडले जात असल्याने काँग्रेस पुन्हा उभारी घेऊ शकेल अशी चर्चा कराड तालुक्यात सुरू झाली आहे.




