पुणे, दि. 2 – वाहनांचे स्पीड कमी करण्यासाठी बसविण्यात आलेल्या स्पीड गव्हर्नरचे नवीन नियम लागू करण्यात आल्याने वाहनांचे पासिंग करण्यास बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील वाहन चालकांचे पासिंगचे काम थांबलेले आहे. परिवहन विभागाने 9 फेब्रुवारी रोजी आदेश काढल्याने वाहनचालकांना पुरेसा वेळ मिळाला नाही. परिवहन विभागाने मुदत वाढवून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांना पत्र पाठवून केली आहे.
परिवहन विभागाने एक मार्चपासून स्पीड गव्हर्नरचे लिंक करण्याचे आदेश दिले आहेत. पण, वाहन चालकांनी मान्यताप्राप्त एजन्सीकडूनच स्पीड गव्हर्नर बसवले असून त्यातील काही कंपन्यांनी ऑफिस बंद केले आहेत. परिवहन विभागाच्या आदेशानुसार एक मार्चपासून संगणकीकरन करणे बंधणकारक आहे. पण, वाहनचालकांना लिंक करण्याबाबत बऱ्याच अडचणी येत आहेत.
त्यामुळे राज्यातील वाहन चालकांचे पासिंगचे काम थांबलेले आहे. विना पासिंग गाडी मालक वाहन रोडवर आणू शकत नाही कारण प्रचंड प्रमाणात दंड लावलेला वाढवण्यात आलेला आहे. यामध्ये वाहन चालकांची कुठलीही चूक नसताना नाहक नवीन स्पीड गव्हर्नर लावावा लागेल अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. वाहन चालकांना यापूर्वी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नसून त्यामुळे जास्त संभ्रम निर्माण झालेला आहे तरी याबाबत काही महिन्याची मुदत देऊन वरील नवीन नियमावलीच्या अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.




