वडोदरा : देशभरात अनेक ठिकाणी रामनवमी साजरी केली जात आहे. त्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्याचेही वृत्त आहे. असे असताना गुजरातमधील वडोदरा येथे रामनवमीच्या दिवशी जातीय हिंसाचार झाला. यामध्ये रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. या घटनेनंतर मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकारानंतर परिसरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने रामनवमीच्या निमित्ताने गुरुवारी मिरवणूक काढली. वडोदरा येथे ही रामनवमीची यात्रा आल्यानंतर दोन गटांत वादावादी झाली. त्यानंतर फतेपुरा गरणा पोलिस चौकीजवळ अचानकपणे मिरवणुकीवर दगडफेक सुरू झाली. समाजकंटकांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकसह अन्य वाहनांची तोडफोड सुरू केली. या गंभीर घटनेची तातडीने दखल घेत पोलिसांनी कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली जात आहे.




