मुंबई : खासदार संजय राऊत यांना मोबाईल मेसेजवर जीवे मारण्याची धमकी आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही धमकी लॉरेन्स बिष्णोई गँगकडून आल्याचा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला आहे. या प्रकरणाची आता जोरदार चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत असताना संजय राऊतांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. तसेच, आपण बोललो तर भूकंप होईल, असं म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही सूचक इशारा दिला आहे.
संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास हा धमकीचा मेसेज आला आहे. “दिल्ली में मिल, तुझे एके ४७ से उडा दूंगा”, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. तसेच, लॉरेन्स बिष्णोई गँगचं नाव यात घेण्यात आल्यामुळे हे प्रकरण अधिक चर्चेत आलं आहे.
यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल केली आहे. “हिंदू विरोधी, मार डालूंगा तुझे. दिल्ली में मिल, एके ४७ से उडा दूंगा मूसेवाला टाईप. लॉरेन्स की ओरसे ये मेसेज है समझ ले”, असं या धमकीच्या मेसेजमध्ये लिहिलं आहे.



