- शासकीय रुग्णालये, संस्था होणार “चकाचक’
पुणे, दि. 1 – जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील सर्व शासकीय दवाखाने, आरोग्य संस्थांमध्ये “सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम राबविण्याबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून सूचना दिल्या. त्यानुसार आता आरोग्य संस्था स्वच्छ, रंगरंगोटीमुळे “चकाचक’ होणार आहे.
जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल रोजी असून, यावर्षी “Health Equity, Health for all’ या थीमवर आरोग्य विभागाच्या रुग्णालयात आरोग्य संस्थेत सर्वांना समान सुविधा उपलब्ध आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी सार्वजनिक रुग्णालयांच्या सुविधांचा वापर केला पाहिजे याबाबत जनसामान्यात जनजागृती निर्माण करायची आहे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी रबविण्यात येत असलेला स्वच्छता दिवस नियमित राबवायचा आहे. शासकीय रुग्णालय म्हटल्यावर अस्वच्छता डोळ्यांसमोर येते. ही प्रतिमा पुसण्यासाठी आणि नागरिक शासकीय रुग्णालयात उपचारासाठी यावेत, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
नेमके काय करायचे?
-आरोग्य संस्था आणि परिसर स्वच्छ करण्यात यावा.
-परिसर व दर्शनी भागात सुशोभीकरण रंगरंगोटी करावी
-उपलब्ध सेवांचे माहिती फलक दर्शनी भागात लावावे.
-रुग्ण कल्याण समिती, स्थानिक स्वयंसेवक, लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घ्यावा.




