छत्रपती संभाजीनगरमधील वज्रमुठ सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. आम्ही सर्व महापुरुषांचा आदर करतो. मात्र, आपल्या राज्यातील महापुरुषांचा राज्यपालांकडून अपमान होत असताना दातखिळी बसली होती का? अशी विचारणा त्यांनी केली.
ते म्हणाले की, तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करता. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान केला. त्यावेळी दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढली नाही? आम्हाला सर्व महापुरुष यांचा आदर आहे. आज दोन केंद्रीय मंत्री राज्य सरकारचे मंत्री गौरव यात्रा काढतात हा दुटप्पीपणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केले हे शक्तीहीन नपुंसक सरकार आहे. सरकारला जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. सावरकरांना भारतरत्न देण्याची आहे का हिंमत? अशी विचारणाही त्यांनी केली.
ते पुढे म्हणाले की, संविधानचा आदर सर्वानी केला पाहिजे, पण त्याला तिलांजली दिली. राज्य सरकार पडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, ही स्थिती देशाला परवडणार नाही. उद्योग येणार नाही, प्रशासन ही व्यवस्थित चालणार नाही. निवडणूक आयोग असे निर्णय कसे देतो हा प्रश्न आहे. न्याय देवतेवर आपला विश्वास आहे. त्यांनी पुढे सांगितले की, मराठवाडा साधू संतांची भूमी आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी मुख्यमंत्री13 मिनिटे देतात ऐवढी उपेक्षा आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्याने केली नसेल. तुम्ही सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून सांगता आणि मराठवाड्याच्या जनतेचा अपमान करतात.
राज्यात उद्योग येणार होते, यांचा पायगुण चांगला नाही उद्योग सगळे निघून गेले. 75 हजार नोकर भरती होणार होते किती लोकांना दिली. कांदा अनुदान जाहीर केले, पण अटी घातल्या. जाती धर्मात भेदभाव केला जात आहे. आज गौरव यात्रा काढतात, तुमच्यात धमक असल्यास सावरकरांना भारतरत्न देऊन दाखवा. महागाई बेरोजगारी वरून लक्ष हटविण्यासाठी घटना घडत आहेत. महाविकास आघडीची सभा होऊ नये म्हणून घटना घडल्या.



