पुणे : पुणे विमानतळांवर जानेवारी ते मार्च दरम्यान चार हजार प्रवाशांची ‘डीजी यात्रा’ सेवेसाठी चाचणी घेण्यात आली. ती चाचणी यशस्वी झाल्यानंतर विमानतळावर आता डीजी यात्रा सेवा सुरू करण्यात आली आहे. अॅपवर आधारित ‘डीजी यात्रा’ सेवेला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मंजुरी दिल्यानंतर हिरवा कंदील मिळाला. त्यामुळे आता लोहगाव (पुणे) विमानतळावर प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी (चेक इन) जास्त वेळ रांगेत थांबावे लागणार नाही याशिवाय प्रवाशांचा चेहराच आता बोर्डिंग पास ठरणार आहे.
नुकतेच पुणे विमानतळाच्या दोन्ही टर्मिनल गेटवर स्कॅनर मशीन बसवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होत आहे.
दुसऱ्या टप्प्यात पुणे विमानतळावर डीजी यात्रा सेवा
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून ‘डीजी यात्रा’ सेवा राबवली जाते. पहिल्या टप्प्यात बंगळुरू, वाराणसी, दिल्ली येथे ही योजना राबविण्यात आली. यानंतर दुसऱ्या टप्प्यात पुणे विमानतळावर ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आली. आता डौजी यात्रा सेवेचे काम पूर्ण झाल्यानंतर भारतीय विमानतळ प्राधिकरणाने त्याची पाहणी केली.
प्रवाशांनी काय करावे?
प्रवाशांना डीजी यात्रा हे अॅप डाऊनलोड करावे लागेल.
त्यावर आधार क्रमांक लिंक करून अन्य तपशील ॲपवर नोंदवावे.
■ त्यानंतर स्वतःचा सेल्फी अपलोड करावा लागेल.
■ अॅप वापरादरम्यान, प्रवाशाचे बायोमेट्रिक तपशील घेतले जातील.
डीजी यात्रा अॅपमध्ये नोंदणी झाल्यानंतर विमानतळावर
• प्रवाशाला चेक इनसाठी जास्त वेळ लागणार नाही.
■ विमानतळावर प्रवाशांचा चेहरा स्कॅन करावा लागेल.
■ यंत्रणेत संबंधित प्रवाशांची विमानतळ टर्मिनलमध्ये प्रवेश केल्याची नोंद होईल.
सिक्युरिटी चेक-इन करताना सीआयएसएफचे जवान संबंधित प्रवाशाचे स्कॅन केलेले छायाचित्र व तिकिटाची पडताळणी करतील.
अवघ्या एक ते दोन मिनिटांत प्रवासी ही सर्व प्रक्रिया पार पाडेल.
■ त्यानंतर प्रवाशांना आत प्रवेश मिळेल
■ यामुळे ‘सीआयएसएफ’ वरचा ताण हलका होईल.



