नवी दिल्ली : केंद्र सरकारची वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) भरघोस कमाई झाली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात १.६० लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा करण्यात आला आहे. हे वर्षभरातील दुसरे सर्वोच्च संकलन ठरले आहे. विशेष म्हणजे, वर्षभरात एकूण १८१० लाख कोटी रुपये जीएसटी सरकारला मिळाला आहे. त्यापूर्वीच्या २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत त्यात २२ टक्के वाढ झाली आहे.
अर्थ मंत्रालयाने जीएसटी संकलनाबाबत माहिती दिली. त्यानुसार मार्चमध्ये एकूण १ लाख ६० हजार १२२ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले. – गेल्या वर्षी मार्चच्या तुलनेत त्यात १३. टक्के वाढ झाली आहे.
यंदाच्या जीएसटी संकलनात केंद्रीय जीएसटी २९,५४७ कोटी, राज्य जीएसटी ३७,३१४ कोटी आणि एकीकृत जीएसटी ८२,१०७ कोटी रुपयांचा समावेश आहे. व्याशिवाय १०,३५५ कोटी रुपयांचा उपकरही सरकारला मिळाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक जीएसटी संकलन एप्रिल २०२२ मध्ये १.६८ लाख कोटी एवढे झाले होते.
- राज्याने दिले २२ हजार कोटी
जीएसटी संकलनात महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्याने सर्वाधिक २२ हजार ६९५ कोटी रुपयांचा महसूल दिला आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये हा आकडा २० हजार ३०५ कोटी एवढा होता. त्याखालोखाल कर्नाटक आणि गुजरातचा समावेश आहे. मात्र, तो आकडा महाराष्ट्राच्या निम्म्यापेक्षाही कमी आहे. आर्थिक उलाढाल सातत्याने वाढत आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षातही जीएसटी संकलनातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तविला आहे.



