मुंबई, दि. ८ शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौरा करणार आहेत. त्यासाठी चलो आयोध्या असा नारा दिल्याने शुक्रवारी (दि. ७ एप्रिल) ठाणे रेल्वे स्थानकातून विशेष अयोध्या ट्रेन सोडण्यात आली त्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या ट्रेनमधून दीड हजारांहून अधिक जिल्ह्यातील शिवसैनिकांनी जय श्री राम आणि शिवसेनाच्या घोषणा देत अयोध्याकडे कूच केली आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिदे यांनी आपल्या दौन्याने घरात बसणाऱ्यांना बाहेर पडावे लागले, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर केली. तसेच आपल्या दौन्यामुळे सर्वच जण कामाला लागले आहेत. तर बाळासाहेब ठाकरे यांचे देखील स्वप्न होते की, अयोध्येत प्रभु रामाचे मंदिर व्हावे आणि ते स्वप्न साकार होत असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या याच दौऱ्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांवर टीकास सोडले आहे. यावेळी राऊत प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते बोलताना म्हणाले की, जे आता गेले आहेत त्यांना अयोध्येचा मार्ग दाखवणारे आम्हीच आहोत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना आणि नसताना अयोध्येला आले होते. या निमित्ताने आम्ही हजारो शिवसैनिकांना आम्ही आमंत्रण दिलं होतं, ज्यात एकनाथ शिंदेही होते असे राऊत यांनी म्हटले आहे.
तसेच ते पुढे म्हणाले, राम हा सत्यवचनी होता, प्रभू श्री राम सचोटी आणि सत्याचे प्रतीक होते. त्यामुळे रामाच्या चरणी जाऊन कोणाला आपली पापे धुवायची इच्छा असेल तर प्रभु श्री राम अशांना आशीर्वाद देत नाही, हा आतापर्यंतचा आमचा अनुभव आहे, असं देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.


