मुंबई : राज्यात सध्या प्रचंड राजकीय घडामोडी घडत असताना काँग्रेस हायकमाडने माजी आमदार आशिष देशमुख यांना पक्षातून निलंबित केले आहे. देशमुख यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर उघडपणे टीका केली होती. त्यानंतर आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.
काँग्रेस नेते आशिष देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत. यामुळे ते लवकरच काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिष देशमुख लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे अधिवेशन घेणार आहेत. यामध्ये शरद पवारांसह सर्व बड्या नेत्यांची उपस्थिती असण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी शरद पवार दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर होते, तिथे आशिष देशमुख यांनी त्यांची भेट घेतली होती.
नाना पटोलेंवर टीकास्र सोडत आशिष देशमुखांनी म्हटले, नाना पटोलेंनी न विचारता विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार पडले. म्हणून नाना पटोलेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यायला पाहिजे होती.
“मी सातत्याने काँग्रेस पक्षाच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. ओबीसी समाज, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या हिताची गोष्ट कोण करत असेल, तर त्याला नोटीस देणे चुकीचे आहे. बजावण्यात आलेल्या नोटीसीला वेळेपूर्वीच शिस्तपालन समितीला उत्तर पाठवण्यात येईल,” असे देशमुखांनी स्पष्ट केले.



