मुंबई : बाबरी पाडल्यानंतर इतकी वर्षे उलटली. त्यानंतर आता खंदकातले उंदीर बाहेर येत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी जो काही उल्लेख केला तो उल्लेख म्हणजे बाबरीच्या आठवणीतून बाहेर पडणं आहे. असे बरेच उंदीर आता बाबरीच्या आठवणीतून बाहेर येत आहेत. ज्याला काही अर्थ नाही. जेव्हा बाबरी पडली तेव्हा तिथे आपले आत्ताचे माननीय पंतप्रधान हे त्यावेळी हिमालयात गेले असावेत. कारण त्यांचंही नाव समोर आलं नव्हतं. चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं ते वक्तव्य चुकीचं म्हणजे साफ चुकीचं आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना नव्हतीच असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी चोख उत्तर दिलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
संतापजनक गोष्ट ही आहे की जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात लपून बसले होते. कुणीही बाहेर यायला तयार नव्हता. आत्ताचे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही नाव कुठेच नव्हतं. सुंदर सिंह भंडारी यांनी अंगलट काही यायला नको म्हणून जाहीर केलं होतं की बाबरी पाडण्यात शिवसैनिकांचा सहभाग होता. ही बातमी आली तेव्हा मी स्वतः हजर होतो. संजय राऊत यांचा फोन आला होता. बाळासाहेबांना मी सांगितलं की बाबरी पाडली.
बाबरी पाडल्यावर बाळासाहेबांना फोन आला होता ते म्हणाले जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान आहे. बाळासाहेबांनी फोन ठेवला आणि म्हणाले हे कसलं नपुंसक नेतृत्व? असं नेतृत्व असेल तर हिंदू उभा राहणार नाही. उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ही टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.



