अजित पवारांनी ईडी क्लीन चिटवर म्हणाले, “मला आणि सुनेत्रा पवार यांना जरंडेश्वर कारखाना प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट मिळाल्याच्या बातमीत अजिबात तथ्य नाही. ती चौकशी सुरू आहे. त्यात कुठल्याही प्रकारची क्लीनचिट मिळालेली नाही.
शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली आणि सव्वा तास चर्चा केली. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (१२ एप्रिल) पत्रकारांशी बोलत होते.
पवार-ठाकरे भेटीवर अजित पवार म्हणाले, “शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील तपशील मला माहिती नाही. मला शरद पवार फक्त म्हणाले होते की, उद्धव ठाकरे मला भेटायला येणार आहेत. बरेच दिवस त्या दोघांची भेट नसल्यामुळे उद्धव ठाकरे भेटायला आले असतील. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत असे दोघेही भेटायला आले होते. तास दीड तास त्यांच्यात चर्चा झाल्याचं बातम्यांवरून माहिती मिळाली आहे.”



