पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे मागील काही काळापासून पक्षात नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. मनसेच्या विविध कार्यक्रमातून वसंत मोरे यांना डावलण्यात येत आहे. याबाबत वसंत मोरे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. यानंतर आता वसंत मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबरोबर एकाच कारमधून प्रवास केला आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
खरं तर, बुधवारी मनसे नेते वसंत मोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच कारमधून प्रवास केला. दोन्ही नेत्यांनी पुण्यातील कात्रज चौकातील पुलाच्या कामाची पाहाणी केली. दरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये काही काळ चर्चा झाल्याचीही माहिती आहे. त्यामुळे वसंत मोरे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशा चर्चांना उधाण आलं आहे.




