मुंबई – गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील म्हणजेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवरील हातिवले टोलनाका सुरू करण्यात आला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे एका दिवसात टोलनाका बंद करण्याची वेळ सरकारवर आली आहे. याबाबतची घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी हा टोलनाका बंद करत असल्याची माहिती दिली. स्थानिक लोकांचे समाधान होत नाही तोवर टोल चालू होणार नाही असेही त्यांनी म्हटले.
हा टोलनाका मंगळवार, 11 एप्रिलपासून सुरू करण्यात आला होता. मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि सुट्टीसाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांच्या खिशावर भार पडण्यास सुरुवात झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या मार्गावर टोल वसुली करण्यास मान्यता दिल्यानंतर टोल वसुलीस सुरुवात झाली. हातिवले टोलनाक्यावरती टोल वसुलीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. सिग्नल यंत्रणाही बसवण्यात आली होती. मात्र, स्थानिकांनी या टोलनाक्याला विरोध केला होता.
काही महिन्यांपूर्वी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी आणि स्थानिकांनी विरोध करत टोलानाका सुरू करण्याचा प्रयत्न हाणून पडला होता. महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोलवसुली करून देणार नाही, अशी भूमिका सर्वपक्षीय राजकीय नेते आणि स्थानिकांनी घेतली होती. 22 डिसेंबरला राजापूरच्या हातिवले येथे टोलवसुली सुरू करण्याचा प्रयत्न झाला. माजी खासदार निलेश राणे ( Nilesh Rane) यांच्यासह सर्वपक्षीय नेते थेट टोलनाक्यावर धडकले. यावेळी त्यांनी रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोवर टोलवसुली करायला देणार नाही असा इशारा दिला होता.
दरम्यान, मंगळवारपासून सुरू झालेल्या टोल वसुलीमुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता. अखेर स्थानिकांचे टोल वसुलीच्या मुद्यावरून समाधान होईपर्यंत टोल वसुली होणार नसल्याची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. आजपासून हातिवले टोलनाक्यावरील वसुली बंद करण्यात आली आहे.
.



