मुंबई : एकीकडे राज्यात महाविकास आघाडीची वज्रमूठ घट होत असताना वज्रमुठीतले मधले बोट मात्र ढासळत चालले आहे अशी चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे. अजितदादा गेले तर राष्ट्रवादीच राहणार नाही, असे सांगत राष्ट्रवादीतले आमदाराचा उघडपणे बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. त्यामुळे आता राज्यात शिंदे सरकार अस्त होऊन पवार सरकारचा उदय होणार का? या चर्चाना जोर धरू लागली आहे.
पण त्या पलिकडे जाऊन राष्ट्रवादीतले “सत्य” सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या तोंडून बाहेर आले आहे. सत्तेशिवाय शहाणपण नाही आणि विकास कामांसाठी सत्तेशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. माणिकरावांच्या याच वक्तव्याला पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दुजोरा दिला आहे. अजितदादा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्यांच्या पाठीशी आम्ही उभे राहू असे वक्तव्य अण्णा बनसोडे यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर जाणार नाही. ज्यांना जायचे ते वैयक्तिक पातळीवर जातील, असे वक्तव्य शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची सिल्वर ओकवर झालेल्या भेटीत केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली होती. त्यामुळे पवारांनी राष्ट्रवादीतल्या आमदारांना वैयक्तिक पातळीवर निर्णय घेण्याची हिंट दिली, असा त्याचा अर्थ राष्ट्रवादीच्या वर्तुळात काढला गेला. त्यामुळेच अजितदादा समर्थक आमदार उघडपणे बाहेर आले आणि त्यांनी सत्तेशिवाय शहाणपण नाही, असे उघड सूचक वाक्य उच्चारून राष्ट्रवादीचे दिशा स्पष्ट केली आहे



