बीडच्या माजलगावात शहरात माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या समर्थनार्थ बॅनर लावल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या बॅनरमध्ये अतिक आणि अशरफचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता.
मंगळवारी सकाळी बीडच्या माजलगाव शहरातील एका चौकात अतिक आणि त्याचा भाऊ अशरफच्या समर्थनार्थ पोस्टर लावण्यात आले. पोस्टरमध्ये या दोघांचा शहीद असा उल्लेख करण्यात आला होता. या संदर्भात विश्वहिंदू परिषद बजरंग दलाकडून पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले होते. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे पोस्टर लावल्या प्रकरणी दत्त मंदे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे करत आहेत.
फिर्यादीत काय आहे ? : माजलगावच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे एक बॅनर लावण्यात आले होते. या बॅनरमार्फत माफिया अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांचे समर्थन करून त्यांच्या हत्येचा निषेध केला गेला होता. फिर्यादीत नोंद आहे की, हे बॅनर माजलगावच्या बिलाल मोहल्ल्यातील नासिर अब्दुल शेख याने छापले होते. ते शेख वाजेद शेख युनुस याच्या फॅशन डिजीटल या बॅनर छापण्याच्या दुकानात छापण्यात आले होते.
सिद्दीकी कॉलनीतील सुमेर सिद्दीकी, राज गल्लीतील मोहसिन युनुस पटेल तसेच इतर अज्ञात व्यक्तींच्या मदतीने हे बॅनर चौकात लावण्यात आले होते. अशा प्रकारचे बॅनर लावून दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच माजलगाव शहर व परिसरातील सामाजिक शांतता व सुव्यवस्थेलाही बाधा निर्माण होऊ शकते, असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.



