“मुंबई, 25 एप्रिल : खासदार संजय राऊत यांनी दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील 500 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी सीबीआयकडे तक्रार केली आहे. राऊत यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले की,”राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आली होती, मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे मी सीबीआयकडे भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील 500 कोटी रुपयांच्या मनी लॉण्डरिंगप्रकरणी तक्रार दाखल केली आहे, आता पुढे काय होते ते पाहूया”
दरम्यान, संजय राऊत बुधवारी वरवंड इथं जाहीर सभा घेणार असून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यातील मनी लाँडरिंग प्रकरणावर ते बोलणार आहेत. संजय राऊत या सभेत काय बोलणार? कोणाचा पर्दाफाश करणार? याची उत्सुकता दौंड तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिगेला पोहोचली आहे. वरवंड येथे नागनाथ विद्यालयाच्या ग्राउंडवर बुधवारी सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. संजय राऊत यांच्या सभेबाबत माजी आमदार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रमेश थोरात यांनी माहिती दिली. संजय राऊत यांच्याशिवाय या सभेसाठी उपनेत्या सुषमा अंधारे, आमदार रवींद्र धंगेकर हेसुद्धा असणार आहेत.



