बोर्लीपंचतन | मकरंद जाधव
बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री मोहनलाल सोनी विद्यालयातील दहावी १९९२ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच प्रसिध्द पर्यटन स्थळ दिवेआगर येथील श्रीमत् रिसॉर्ट येथे मोठ्या उत्साहात संपन्न झालं.निलिमा दिवेकर व रविंद्र मोरे यांनी आपल्या सुरेल आवाजात स्वागत गीत गाऊन स्नेहसंमेलनाची सुरवात केली.आपल्या विभागातील गरीब परिस्थिती असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची ज्ञानगंगा उपलब्ध करून देणाऱ्या जनता शिक्षण संस्थेचे व आपल्याला एक आदर्श ओळख देण्याचे काम करणाऱ्या शिक्षकांप्रती सर्वांनी ऋण व्यक्त करतानाच आपल्याला कायमचे सोडून गेलेले शाळेतील काही शिक्षक,कर्मचारी व मित्र यांच्या स्मृतीला श्रध्दांजली वाहण्यात आली.
कल्पेश शहा याने या स्नेह मिलनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपले शालेय जिवनातील मित्र मैत्रिणी पुन्हा भेटणार या आनंदाने सुट्टीचे नियोजन करुन थेट ऑस्ट्रेलियातून येऊन उपस्थित राहील्याबद्दल त्याचे विशेष आभार मानण्यात आले.आपल्या नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, चिपळूण,पनवेल,अलिबाग,रोहा अशा ठिकाणी राहणारे २८ मित्र मैत्रिणी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहीले.३२ वर्षांच्या कालावधीत प्रत्येकाच्या दिसण्यात खूप बदल झाला होता.मात्र आप आपली ओळख पटल्यानंतर जुन्या आठवणीत रमताना शाळेतील गमती जमती,शिक्षक- शिक्षिकांच्या विविध आठवणी, खाल्लेला मार,केलेला खोडकरपणा आठवताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
लज्जतदार जेवणाबरोबरच आतापर्यंत जीवनातील कडू गोड आठवणी,आपण करत असलेल्या नोकरी, व्यवसाबाबतचे अनुभव सांगताना विविध क्षेत्रात काम करीत असताना जीवनात मिळालेल्या यशामागे शाळेतील संस्कारांचा मोलाचा वाटा असल्याच्या भावना सर्वांनी व्यक्त करतानाच आपल्या मुलांबाबत माहीती देऊन एकमेकांना उर्वरित आयुष्यास शुभेच्छा दिल्या. आपल्या बॅचची ज्योती परकर हिला मिळालेला गावच्या सरपंच पदाचा मान,कोरोना काळात आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणारी परिचारीका अंजनी तोंडलेकर,उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार प्राप्त सचिन हळदे,दिव्यांग असुनही स्वावलंबनाचा आदर्श समाजापुढे ठेवणारी धनिष्ठा परकर या मित्र मैत्रिणींचा विशेष सत्कार करण्यात आला.या क्षणांची आठवण मनात कायम रहावी याकरीता प्रत्येकाचे छायाचित्र असलेला कॉफी मग प्रत्येकाला भेट देण्यात आला.
सायंकाळी समुद्रकिनारी मौजमजा करुन या स्नेहमिलनाचे सुंदर आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या कमलेश शहा,वैशाली तोंडलेकर,संतोष पाटील,ज्योती परकर यांचे सर्वांनी आभार व्यक्त केले. तब्बल ३२ वर्षांनी ऋणानुबंधाच्या जुन्या आठवणींना उजाळा देतानाच नव्याने तयार झालेल्या अविस्मरणीय आठवणींचा ठेवा सर्वांच्या एकत्र छायाचित्रासह आपल्या हृदयात साठवून सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम एकमेकांच्या संपर्कात राहून पुन्हा भेटण्याचा निश्चय करुन एकमेकांचा निरोप घेतला.



