मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पुढच्या काही दिवसांत निकाल लागेल, अशी स्थिती असताना इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना जोरदार उधाण आलंय. एकनाथ शिंदे यांची खुर्ची जाऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना लॉटरी लागणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. अशावेळी राज्याचे मंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी सत्ताबदलाचं हे वारं सर्वांत आधी ओळखलं आहे. माझी छाती फाडून बघितली तरी त्यातही राधाकृष्ण विखे पाटीलच दिसतील, असं मोठं वक्तव्य सत्तार यांनी केलंय. तसेच मित्र मोठा व्हावा, असं कुणाला वाटत नाही, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.
आगामी निवडणुकीला सामोरे जाताना मराठा चेहरा असावा, असे भाजपला वाटत असल्याने आणि अन्य समीकरणेही जुळत असल्याने विखे पाटील यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची चर्चा होती. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अद्याप यायचा आहे. मात्र, तोपर्यंत अनेक राजकीय नवी समीकरणे चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे भाजपचे सहकारातील ज्येष्ठ नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री होणार… सगळीकडे ही चर्चा जोरात सुरु असताना शिंदे गटातही ही चर्चा सुरु आहे. खुद्द शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनीही विखेंच्या मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली आहे.