मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार, असा निर्णय शरद पवार यांनी जाहीर करताच यशवंतराव चव्हाण सभागृह घोषणांनी दणाणलं. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार… शरद पवार..’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. एवढचं नव्हे तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि नेत्यांनी शरद पवार यांना स्टेजवर जाऊन अनेक कार्यकर्ते आणि नेत्यांनी यावेळी विनवनी केली आणि त्यांना अश्रू अनावर झाले. यावेळी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे शरद पवार यांच्या पाया पडले आणि पक्षाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. यामुळे सभागृह भावुक वातावरण निर्माण झालं.शरद पवार हे सपत्नीक सभागृहात उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते, खासदार, आमदार, नेते आणि कार्यकर्त्यांनी पवारांजवळ एकच गर्दी केली. शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. अंकुश काकडे, प्रकाश गजभिये यांनीही स्टेजवर जाऊन शरद पवारांचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका मांडली आहे.