अलीकडेच वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. यावरून अनेक राजकीय आखाडे बांधण्यात आले. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. याच आता शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची झालेली भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाचा विरोध काँग्रेस करत नाही, असे मत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हाय. बी. चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांची भेट झाली. राज्याच्या राजकारणात लवकरच मोठे राजकीय भूकंप होणार असे वक्तव्य अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत झालेल्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, शरद पवार यांनी या भेटीबाबत खुलासा केला. प्रकाश आंबेडकर आणि राष्ट्रवादी हे दोघेही कर्नाटकात काही जागा लढवत आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट झाल्याच्या चर्चांना शरद पवारांकडून दुजोरा देण्यात आला.
वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही
राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी सकारात्मक ठरली आहे, असे अतुल लोंढे यांनी सांगितले. तसेच चित विकास आघाडीच्या मविआ मधील प्रवेशासाठी काँग्रेस विरोधात आहे का, असा प्रश्न अतुल लोंढे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील प्रवेशाबाबत काँग्रेसचा विरोध नाही, असे अतुल लोंढे यांनी स्पष्ट केले.



