
लोक माझे सांगाती या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत झाला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते तसेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना अचानक शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याची घोषणा केली. यानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक नेते, कार्यकर्ते मंचावर जात शरद पवार यांची समजूत काढू लागले.
शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती सर्वच उपस्थित नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांनी केले. प्रसंगी निर्णय मागे घेत नाही, तोपर्यंत उपोषणाला बसू, अन्न-पाणी त्यागू, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला. शरद पवार यांचा हा निर्णय समजताच राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले होते. सर्वच जण शरद पवार यांना आजच निर्णय मागे घ्यावा, असा आग्रह धरत होते. यातच अजित पवार उठले आणि कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले.



