मुंबई : राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांनी अचानक निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत महाभूकंप झाला आहे. शरद पवार असा काही निर्णय घेतील असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण पवार यांनी निर्णय घेतल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या राजीनाम्याला सर्वांनीच विरोध केला आहे. पवार यांनी अचानक राजीनामा घेण्याचा निर्णय का घेतला? अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, शरद पवार हे राजीनामा देणार हे आधीच ठरलं होतं, अशी माहिती पुढे येत आहे. स्वत: अजित पवार यांनीच त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर सर्वांनीच पवार यांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह धरला. सर्वांनीच गोंधळ घातला. सर्वच नेत्यांनी भाषण करताना राजीनामा मागे घेण्याचा पवारांना आग्रह धरला. पण पवारांचा हा राजीनामा आधीच ठरलेला होता, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट करून सर्वांनाच धक्का दिला आहे.



