
नागपूर: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा करत राज्याच्या नाही तर संपूर्ण देशाच्या राजकारणात खळबळ माजवून दिली. यामुळे राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांना शॉक लागलाच पण राज्यातील इतर राजकीय पक्षानांही धक्का बसला. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सध्या या विषयावर बोलणे योग्य नाही, असं फडणवीस म्हणाले. तसेच, त्यांनी यावेळी एक मोठी घोषणाही केली.
शरद पवार साहेबांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. त्यावर बरीच चर्चा आणि मंथन सुरु आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू. मी अजून शरद पवार यांचे पुस्तक वाचलेले नाही. त्यामुळे त्यावर आताच बोलणार नाही. मलाही एक पुस्तक लिहायचे आहे, ते योग्य वेळी लिहिणार आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे आणि सत्य काय आहे, हे मी त्यात मांडेन’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


