![]()
पुणे : पुण्यात वाहतूक कोंडी नित्याचेच झाले आहे. पुण्यातील कोणत्याही रस्त्यावर गेले तरी पार्किंगची समस्याही दिवसेंदिवस भीषण होत आहे. त्यामुळे नो पार्किंगमध्ये वाहने उभे करण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी नो पार्किंगमधील उभी असलेली वाहने टोईंग करताना कर्मचारी आणि वाहनचालक यांच्यात वाद होत असतात. यात प्रामुख्याने टोईंग कर्मचाऱ्यांची दादागिरी ही नेहमीच पाहायला मिळते. अशाच एका धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ पुण्यातील हडपसर भागातून समोर आला आहे.
हडपसर परिसरातील महादेवनगर येथील दुकानदार रमेश बराई यांना रस्त्यावरील वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेने नेमलेल्या कर्मचार्यांनी तुफान मारहाण केल्याचं व्हिडिओतून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यासमोरच ही फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. यामध्ये रमेश बराई यांना टोईंग कर्मचाऱ्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. यासंदर्भात बराई यांनी तक्रार दिली असून या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.




