मुंबई : शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर नवा अध्यक्ष निवडण्यासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या समितीने शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहावे असा एकमुखी ठराव मंजूर केला. त्यामुळे आता या ठरावावर शरद पवार कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आज सकाळी अकरा वाजता अध्यक्ष निवड समितीची बैठक सुरू होण्यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून जोरदार घोषणा देत मोठी गर्दी केली होती. स्वतः समितीचे सदस्य असलेले छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड यांनी बैठकीच्या आधीच शरद पवारांना अध्यक्षपद सोडता येणार नाही. त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे म्हणून बैठकीत ठराव केला जाईल असे स्पष्ट केले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत. या महत्त्वाच्या निवडणुका पहाता शरद पवारांनी अध्यक्षपद न सोडता आमचे नेतृत्व करावे, अशी भूमिका मांडली.



