कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत जनतेचे मोठे समर्थन काँग्रेस पक्षाला मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे जनता काँग्रेसला बहुमताने विजयी करेल. काँग्रेस पक्षच सर्वांना बरोबर घेऊन विकास करु शकतो, हा जनतेला विश्वास आहे. भाजपाला कर्नाटकात नॅनो कारमध्ये बसावे लागेल अशी होईल, असं विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. ते साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
“कर्नाटकमध्ये भाजपाला पोषक वातावरण नसल्याने ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा आधार घेत जनतेत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, भाजपाच्या अशा कोणत्याच भुलथापांना कर्नाटकची जनता बळी पडणार नाही. ‘काश्मीर फाईल्स’ चित्रपटाचं भांडवल करत भाजपाने काश्मिरी पंडितांवर अत्याचार होत असल्याचा डांगोरा पिटला. काश्मीरमध्ये राज्यपाल आहेत, केंद्रात भाजपाची सत्ता आहे. मग काश्मिरी पंडितांवरचे अत्याचार थांबवण्यासाठी त्यांनी काय केल?,” असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला आहे.



