
सातारा : रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली. मंगळवारी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पवार यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची फेरनिवड करण्यात आल्याचे रयत शिक्षण संस्थेच्या सूत्रांनी सांगितले. संस्थेचे विद्यमान सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांना सहा महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे.
आगामी काळात या पदावर माजी सनदी अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची चर्चा आहे.कर्मवीर पुण्यतिथी दिनी नऊ मे रोजी दर तीन वर्षांनी रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते. आज त्या निवडी होणार होत्या.
मात्र या निवडी पूर्ण झाल्या नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष, आजीव सेवक आणि व्यवस्थापक मंडळाचे सदस्य यांची निवड करण्यात आली. सचिव पदावर कोणालाही संधी देण्यात आली नाही. विठ्ठल शिवनकर यांनाच सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नवीन सचिवाची निवड पुढील कालावधीत केली जाणार आहे.



