मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना शिंदे-फडणवीस सरकारने मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले असून निलंबनही मागे घेतलं आहे. विविध भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने डिसेंबर २०२१ मध्ये परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने मागे घेतला आहे.
परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. परमबीर सिंह यांचं निलंबन कॅटने रद्द केलं आहे. कॅटच्या निर्णयाची अंमलबजावणी केवळ राज्य सरकारने केली आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेण्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अलीकडेच कॅटचा एक निर्णय आला होता. त्यांनी परमबीर सिंह यांच्यावरील विभागीय चौकशी बेकायदेशीर ठरवली. कॅटनेच त्यांच्यावरील निलंबन रद्द केलं आहे. त्यामुळे कॅटच्या निर्णयाची अंमलबजावणी केवळ राज्य सरकारने केली आहे. त्यामुळे त्यांचं निलंबनही मागे घेण्यात आलं आहे.”



