पुणे : मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये असल्याच्या अफवा उठविण्यात येत आहेत. आगामी निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत लढविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये मी नाही, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितले.
पुणे विद्यार्थी गृहाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी आले असताना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सत्तासंघर्षाबाबत न्यायालयाने दिलेला निकाल, मंत्रिमंडळ विस्तार, भारतीय जनता पक्ष विरोधकांची एकी अशा विषयासंदर्भात त्यांनी भाष्य केले.
युती म्हणून मतदारांचा कौल मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या आणि सत्तेसाठी लाचार होणाऱ्या उद्धव ठाकरे यांना नैतिकतेची भाषा शोभत नाही, अशी टीका राधाकृष्ण विखे-पाटील यांनी येथे केली. सर्वोच्च न्यालालयाच्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, न्यायालयाने निकालात काही गोष्टी बेकायदा ठरविल्या आहेत. त्यामुळे नैतिकता स्वीकारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.



