मुंबई; संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला चारी मुंड्या चित करून काँग्रेसने 134 च्या आसपास जागा जिंकत एक हाती सत्ता मिळवली आहे. कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. तर अनेक नेत्यांनी आपापले मत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.
वरती प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन करत अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले.



