मुंबई: कर्नाटक निवडणूक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता स्वत: मैदानात उतरले आहेत. पवारांनी उद्या महविकास आघाडीची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहे. शरद पवार यांचे मुंबईतील निवास्थान सिल्वर ओकवर उद्या ही बैठक होणार आहे. या बैठकीत कर्नाटकप्रमाणे यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये एकत्र काम करण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून मतभेत असल्याची चर्चा होती. तिन्ही पक्षातील नेत्यांनी एकमेकांविरोधातील वक्तव्ये केले होते. त्यावर वार-पलटवार देखील पाहायला मिळाले. पवारांनी राजीनामा दिल्यानंतर नाना पटोले आणि संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका केली होती, तर पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत कामाच्या शैलीबाबत केलेल्या लिखानामुळे ठाकरे दुखावले होते, त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील मी दिलेला सल्ला त्यांना पचेल का? असे म्हणत पवारांना टोला लगावला होता.
दरम्यान रत्नागिरीत काँग्रेसमधील नेत्याने शिवसेनेत प्रवेश केल्याने नाना पटोले नाराज झाले होते, त्यांनी देखील उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आगाडीची घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी शरद पवार यांनी उद्याची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाविकासआघाडीतील मतभेद दूर करून आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने मैदानात उतरण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.



