मुंबई : माटुंगा येथे आईस्क्रीम पार्लरमध्ये गोंधळ घालणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी तृतीयतंथींसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी एका आईस्क्रीम पार्लरमध्ये प्रवेश केला आणि दुकानमालकाला लुटण्याचा प्रयत्न केला.
काही आरोपींनी मालकांसमोरच अंगावरचे कपडे काढले आणि त्यांना मारहाणही केली, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी आरोपींना नोटीस देऊन सोडण्यात आले. रविवारी घडलेल्या याप्रकारानंतर माटुंगा सर्कल परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
माटुंगा पूर्व परिसरातील महेश्वरी उद्यान येथील ‘जस्ट इन सेव्हन’ आईस्क्रीम पार्लरमध्ये रविवारी रात्री 10 च्या सुमारास ही घटना घडली. आरोपी ‘जस्ट इन सेव्हन’ या दुकानात घुसले आणि त्यांनी दुकानाचे मालक जमशेद शापूर इराणी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी दुकानाच्या बाहेरील मातीच्या कुंड्या व दुकानाच्या जाहिरात फलकाची तोडफोड केली. यावेळी आरोपींमधील दोन तृतीयपंथींनी अंगावरचे कपडे काढून शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपींना पांगविण्याचा प्रयत्न केला.



