मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आल्याची माहिती मिळत आहे. राज्याच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवरती फडणवीसांचा दिल्ली दौरा होता, अशी खात्रीशीर सूत्रांनी माहिती दिली आहे. मात्र फडणवीस दिल्लीला गेले होते, ही माहिती नागपूरच्या भाजप कार्यालयाकडून नाकारण्यात येते. याबाबत एका मराठी वाहिनीने वृत्त दिले आहे.
कालच दि. १९ मे रोजी देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि काटोलचा दौरा केलेला होता. दिवसभर त्यांनी प्रशाकीय आढावा बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यालाही त्यांनी संबोधित केलं. संध्याकाळच्या सुमारास ते नागपूरातून निघाले होते.
सूत्रांकडून जी काही माहिती मिळत आहे, त्यानुसार फडणवीस हे अवघ्या काही तासांसाठी नवी दिल्लीला जाऊन आले. पुन्हा मध्यरात्री ते नागपूरला परतले. मात्र याबाबतची त्यांच्या नागपूर कार्यालयाकडून याची माहिती नाकारली जात आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार –
मागील बऱ्याच कालावधीपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागल्याची चर्चा आहे.
गेल्या दहा महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार २३ किंवा २४ मे रोजी होण्याची चर्चा सत्ताधारी पक्षांच्या आमदारांमध्ये सुरु आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागावी, यासाठी सत्तेतील शिवसेनेसह भाजप आणि सरकारला पाठिंबा दिलेल्या अपक्ष आमदारांनी ‘फिल्डिंग’ लावली आहे. यामुळे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनीपक्षश्रेष्ठींशी चर्चा केली का? अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.



