नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पलटवला असून दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगसंबधीचे अधिकार स्वतःकडे ठेवण्यासाठीचा अध्यादेश काढण्यात आला आहे. केंद्र सरकारने हा अध्यादेश दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार यांना दिला असून हा केजरीवाल सरकारसाठी मोठी धक्का असल्याचं म्हंटलं जात आहे.
गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधी निकाल दिला. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंगचे अधिकार हे दिल्ली सरकारला असल्याचा निर्णय देण्यात आला होता. केंद्र सरकारच्या या अध्यादेशानंतर दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्याचे अधिकार हे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांच्याकडे म्हणजे अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारकडे असणार आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत याआधीच भीती व्यक्त केली होती. ‘नायब राज्यपाल न्यायालयाच्या आदेशाचे पालन का करत नाहीत? दोन दिवस सेवा सचिवांच्या निलंबनाच्या फाईलवर सही का केली नाही? पुढच्या आठवड्यात केंद्र सरकार अध्यादेश आणून सर्वोच्च न्यायालयाचा आदेश फिरवणार आहे असे बोलले जात आहे. नायब राज्यपाल अध्यादेशाची वाट पाहत आहेत, म्हणून फाइलवर सही का करत नाहीत?’, अरविंद केजरीवाल असं ट्वीट केलं होतं.




