२८ मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे. मात्र, या सोहळ्यापूर्वीच नवा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपतींना निमंत्रण न दिल्यावरून तीव्र नाराजी व्यक्त करत २० पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. तर, भाजपसह १७ पक्ष सहभागी होणार आहेत. यातच आता नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाला न जाण्याच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पाठिंबा दिला असून, मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.
संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले
अनेक वर्षापासून संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचले. असा महत्त्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतले नाही. आता इमारत तयार झाली आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तसेच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना विधीमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याचे म्हटले जात आहे. यावर बोलताना, याचा अर्थ असा आहे, की निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम निर्णय आल्यावर प्रतिक्रिया देणे योग्य होईल, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान, विरोधकांनी बहिष्काराची भूमिका घेतली असली तरी केंद्रातील मोदी सरकारकडून नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. याची एक कार्यक्रमपत्रिका समोर आली आहे. तसेच या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने दिल्लीतील वाहतुकीत बदल करण्यात येत असून, त्यासंदर्भातील माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात येत आहे.



