भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पुणे लोकसभेसाठी कधीही पोटनिवडणूक लागू शकते. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली आहे. सध्या तरी महाविकास आघाडीमध्ये पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत बोलताना ज्याची त्याठिकाणी ताकद जास्त आहे त्या पक्षाचा उमेदवार असेल असं अजित पवारांनी म्हंटल आहे.
अजित पवार म्हणाले, लोकसभेच्या निवडणूकीला एकच वर्ष राहीलं आहे. त्यामुळे पोटनिवडणूक लागणार नाही असे मला वाटलं होते. पण पुण्यात पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती आहे. निवडणूक लागेल तिथे मित्र पक्षांच्यामध्ये ज्यांची ताकद जास्त असेल त्यांना ती जागा मिळावी. आता ताकद पाहणे म्हणजे वजन करायचे का? तर नाही… मागील निवडणुकीत ज्यांना जास्त मते त्यांची ताकद जास्त असे समजता येईल असं अजित पवार म्हणाले. यावेळी त्यांनी काही उदाहरणे सुद्धा दिली.




