मुंबई : मुंबई महानगरपालिकेने ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पाअंतर्गत मिठी नदीतील काही लाख लिटर पाण्याची गुणवत्ता वृद्धींगत करून ते पुन्हा नदीत सोडण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे मिठी नदीतील पाण्याची गुणवत्ता सुधारत असल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्यामुळे मिठी नदीत काही ठिकाणी मासे दिसू लागले आहेत, असाही दावा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.
महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार ‘मिठी नदी जल गुणवत्ता सुधार’ प्रकल्प राबविण्यात येत आहे. मुंबईतच उगम पावणाऱ्या आणि मुंबईतच समुद्राला जाऊन मिळणाऱ्या मिठी नदीची एकूण लांबी १७.८४ किलोमीटर इतकी आहे. या नदीचे पाणलोट क्षेत्र साधारणपणे ७ हजार २९५ हेक्टर एवढे आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विहार आणि पवई तलावांमधून होणारा विसर्ग हा या नदीचा प्रमुख जलस्रोत आहे. ही नदी माहिमच्या खाडीतून समुद्राला जाऊन मिळते.



