पिंपरी : भाजपने लोकसभे पाठोपाठ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरूवात केली आहे. राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघाच्या प्रमुखांची नव्याने निवड जाहीर केली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (ता. ८) या प्रमुखांची यादी जाहीर केली. यामध्ये शहरातील चिंचवड पिंपरी व भोसरी या तिन्ही विधानसभा अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
यामध्ये चिंचवड विधानसभा प्रमुख पदी स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप यांचे खंदे समर्थक काळूराम बारणे, भोसरी विधानसभा अध्यक्षपदी विकास डोळस व पिंपरी विधानसभा अध्यक्षपदी श्री. गोरखे यांची निवड केली आहे. ही निवड करताना भाजपने विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी आमदार, खासदारांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचा विचार केला आहे. या प्रमुखांवर संबंधित विधानसभेतील उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी असणार आहे. त्यासाठी त्यांना स्थानिक पातळीवर योग्य ते निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असेल. या प्रमुखांचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्वागत केले आहे.
शहरातील विधानसभा निवडणूक प्रमुख व त्यांच्या अनुभव व संघटन कौशल्यावर पक्षाने विश्वास दाखविला आहे. त्यांच्यावर संघटन बळकट करून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत युतीला विजय मिळवून देतील असा विश्वास स्थानिक पदाधिकारी यांनी व्यक्त केला. तिन्ही विधानसभा प्रमुखांना पक्षातील सर्व नेत्यांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.




