मुंबई : राज्यातील समुद्र किनारी भागातील नागरिकांनी समुद्र किनारी भागात जावू नये. राज्यात अनेक अनेक ठिकाणी सध्या कडक ऊन आहे. त्याचवेळी काही भागांत मोसमी पाऊसही होत आहे. दरम्यान, अरबी समुद्रात यावर्षी निर्माण झालेल्या ‘बिपोरजॉय’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढून त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले आहे.
बिपोरजॉय चक्रीवादळाने तीव्र रुप धारण केले असून समुद्रात उसळलेल्या तुफानी लाटांनी मुंबईकरांना धडकी भरली आहे. अशातच राज्याला यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत भरतीच्या लाटा दिसल्या. मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया भागातील व्हिडीओ समोर आले आहेत. समुद्र किनाऱ्यांवर तुफानी लाटा पाहण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे.
.कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला इथे आज वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सोबतच राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर संपूर्ण विदर्भात 15 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. आज हवामान विभागाकडून महाराष्ट्रात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
वांद्रे वरळी सी लिंकच्या खांबांवर उंच उंच लाटा आदळत होत्या. दादर चौपाटीवर सुरक्षा कठड्यापर्यंत लाटा धडकत होत्या. तर वरळी आणि मरीन ड्राईव्ह येथे भररस्त्यावर उंच लाटा उसळून येत होत्या. या लाटा आणि वाऱ्याने मुंबईच्या वातावरणात मोठा फरक पडला आहे. ११ जून २०२३ रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. हवामान खात्याच्या वतीने यासंदर्भात माहिती देण्यात आली.



