मुंबई : वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने आज मेळावा आयोजीत केला होता. यामध्ये अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. शिंदे नुसतीच दाढी कुरवाळत बसतात, जरा काम करा, असे अजित पवार म्हणाले.
कोणत्याच विषयावर सरकार उत्तर देत नाहीत. राज्यातलं सरकार काय काम करत आहे का फक्त झोपा काढत आहे. धरणे आटू लागले आहेत. मात्र सरकारला गांभीर्य नाही. फक्त धार्मीक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, असे अजित पवार म्हणाले. एकनाथ शिंदेंना म्हटलं तर ते म्हणतात तुम्ही आमच्यावर नेहमी टीका करतात. तुम्ही नुसतीच दाढी कुरवळत बसता मग टीका करु नाही तर काय करु. तुम्ही निकाल द्यायला हवे, असा मुख्यमंत्री पहिले कधी झाला नव्हता, असा टोला अजित पवार यांनी लगावला.
अजित पवार म्हणाले, सुरत, गुवाहाटी, गोव्याला गेले. दोन-चार राज्य फिरून आले. असला धंदा करायला फिरून आलेत का. आमच्या शेतकऱ्यांचे वाटोळे करायला फिरुन आलात का. शेतकऱ्याचा कापूस विकल्या जात नाही. कांदा उत्पादक शेतकरी म्हणतो आता हैदराबादला जायच आणि कांदा विकायचा चारपट भाव आहे.हैदराबाद देऊ शकतो मग मुंबई का नाही देऊ शकत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच करु शकत नाहीत. त्यांच्यापेक्षा आपले राज्य आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. जर ते लोक समाधानी राहू शकतात. आपण का नाही राहू शकत, असे अजित पवार म्हणाले.



