पुणे ः शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या क्षमता विस्तार आराखड्याअंतर्गत मागणी नसलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमांच्या 652 तुकड्या बंद करुन जादा मागणी असलेल्या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 652 नवीन तुकड्या सुरू करण्यात येणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून घेण्यात आला आहे.
राज्यातील संस्थांमध्ये सुरु केलेल्या अभ्यासक्रमांपैकी ड्रायव्हर कम मेकॅनिक, डेटा एन्ट्री ऑपरेटर, मेकॅनिक रेडिओ आणि टेलिव्हिजन यांसारखे काही अभ्यासक्रम नवी दिल्लीच्या प्रशिक्षण महानिदेशालय (डीजीटी) यांच्याकडून बंद करण्यात आले आहेत. त्याऐवजी नवीन तंत्रज्ञानावर आधारित विंड पॉवर प्लांट टेक्निशियन, स्मॉल हायड्रो पॉवर प्लांट टेक्निशियन, ड्रोन टेक्निशियन हे अभ्यासक्रम नव्याने सुरु करण्यात आले आहेत.
राज्यातील अल्पसंख्याक बहुल भागातील 44 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये 237 तुकड्या सुरु करण्यात आल्या आहेत. त्यापैकी कमी मागणीमुळे 17 तुकड्या बंद करण्यात आल्या आहेत.
व्यवसाय अभ्यासक्रमाच्या 652 तुकड्या नव्याने सुरु करण्यासाठी शिक्षक पदे नव्याने निर्माण करण्यात येणार नाहीत. या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या तुकड्यांसाठी आवश्यकता असलेली शिक्षक पदे रुपांतरणाने अथवा स्थलांतरणाने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याने वेतनासाठी राज्य शासनाच्या निधीवर कोणताही अतिरिक्त भार येणार नाही.




