मुंबई : पुण्यात माथेफिरूने केलेल्या हल्ल्यात एका तरुणीचा जीव वाचणाऱ्या तीन जिगरबाज योद्ध्यांना आज भेटलो. लेशपाल जवळगे, हर्षद पाटील, दिनेश मडावी या तीन तरुणांनी आपल्या जीवाची बाजी लावत एका तरुणीचा जीव वाचवला. इतकंच नव्हे तर हल्ला करणाऱ्या तरुणाचा जीव देखील या युवकांनी वाचवला आहे.
या तिघांसोबत गप्पा मारत असताना एक गोष्ट मात्र जाणवली आणि सुखद धक्का बसला.छत्रपती शिवाजी महाराज,शाहू,फुले आणि आंबेडकर यांच्या मार्गावर चालणारी ही मुलं आहेत.सदर घटना घडल्यानंतर ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. अनेकांनी त्यांची काळजी पोटी चौकशी केली.परंतु अनेकांनी त्या हल्लेखोरांची जात विचारून त्यांना हैराण केले.मुलीची जात विचारून तिची ओळख नेमकी काय आहे,हे विचारण्या पर्यंत काही लोकांची मजल गेली.
या प्रकाराने ही मुलं दुःखी दिसली.याबद्दल बोलताना त्यांचा सामूहिक सुर असा दिसला की,”आम्ही जात बघून त्या मुलीला वाचवलं नाही.आमच्या समोर एका मुलीचा जीव जातोय आणि अश्या वेळी आम्ही षंढासारखे गप्प बसू शकत नव्हतो. आपल्या बहिणीची रक्षा केली पाहिजे,या विचाराने आम्ही तिचा जीव वाचवला…!”
विचारांनी प्रगल्भ आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार समर्थपणे पुढे घेऊन जाणारे हे वाघ आहेत.अशी तरुण मंडळी या समाजात मोठ्या संख्येने निर्माण झाली तर आपल्या राज्याचं भविष्य नक्कीच उज्वल असेल,यात शंका नाही. असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
मी शब्द दिला होता त्याप्रमाणे,तिघांना पारितोषिक दिलं आहे.या तिन्ही मुलांनी एक प्रेमळ आणि हक्काची मागणी केली की, त्यांना पवार साहेबांना भेटायचं आहे..! आणि लवकरच मी त्यांची ही मागणी देखील पूर्ण करणार असे आव्हाड यांनी म्हटले आहे.



