कराड: राष्ट्रीय नेते शरद पवार हे उद्या सोमवारी कराडला येणार असून, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याची माहिती देताना, शरद पवारांची जी भूमिका तीच आपलीही भूमिका असल्याचे ‘कराड उत्तर’चे आमदार व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवारांसोबत बहुसंख्य आमदार राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाले. या वेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात आमदार बाळासाहेब पाटील अजित पवारांसोबत गेले का? असा प्रश्न भेडसावत असतानाच बाळासाहेबांनी माध्यम प्रतिनिधींना बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचा कराड उत्तर या मतदारसंघाचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे.
पी. डी. पाटील हे सन १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या मंत्रिमंडळाला पी. डी. पाटील यांनी पाठींबा द्यावा आणि सहकारमंत्री म्हणून पदभार स्वीकारावा यासाठी या सरकारमधील नेत्यांनी प्रयत्न केले. सहकार खात्याचे कॅबिनेटमंत्रीपद राखूनही ठेवले. परंतु, यशवंत निष्ठेशी बांधिलकी जपत पी. डी. पाटील यांनी ती संधी डावलली होती. आजही त्यांचे पुत्र आमदार बाळासाहेब पाटील हेही यशवंत विचाराशी नाळ घट्ट असल्याचे दाखवून देत आहेत. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून बाळासाहेब त्यांच्यासोबतच गेले असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. परंतु, शरद पवारांच्या भूमिकेशी बिलकुल फारकत नसल्याचे बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहेत.



