सातारा – अजित पवारांसह ९ राष्ट्रवादी आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर रातोरात पक्षाकडून या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यात प्रामुख्याने विधानसभा अध्यक्षांना पक्षाकडून पत्र देण्यात आले. या सर्व घडामोडीत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही अपात्रतेच्या भानगडीत पडणार नाही. कुठली कारवाई करणार नाही. आम्ही जनतेत जाणार असं म्हटल्याने राष्ट्रवादीत २ मत प्रवाह असल्याचे समोर आले.
सातारा दौऱ्यावर असणाऱ्या शरद पवारांना पत्रकारांनी ही माहिती दिल्यानंतर ते म्हणाले की, मी आज सकाळपासून बाहेर पडलोय. पक्षाच्या विधिमंडळाचे सर्व अधिकार नेते म्हणून पहिल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अपात्र करायचा की नाही हा अधिकार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. जयंत पाटील हे पक्षाचे शिस्तबद्ध, कायदा जाणणारे नेते आहेत. त्यांनी अपात्रतेबाबत काही निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. पक्षाची घटना आणि नियम पाहूनच ते काम करतात असं पवारांनी स्पष्ट केले.



