मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 2 जुलै रोजी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अजित पवार लवकरच म्हणजे याच वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होतील. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा याला पाठिंबा असेल की नाही माहित नाही. पण अजित पवार याच वर्षी मुख्यमंत्री होतील, असा विश्वास अमोल मिटकरी यांनी व्यक्त केला आहे.
अजित पवारांबाबतच्या बऱ्याच चर्चा खऱ्या होतात. अजित पवार राज्याचं नेतृत्व करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि त्यांनी ते करावं. शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेबद्दलचा निकाल प्रलंबित आहे, तो लागला की ठरवू. सध्या एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अजितदादाही मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी पांडुरंगाला साकडं घातलं आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले. कायदेशीर बाबींबद्दल मी बोलणार नाही, तो अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. जर राज्याचं सत्तासमीकरण बदललं तर आगे आगे देखो होता क्या है, असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे



