मुंबई : अजित पवारांच्या वेगळ्या वाटेमुळे महाराष्ट्रातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट तयार झाले आहेत. त्यातच उद्या मुंबईत दोन्हीही गटाकडून होणाऱ्या बैठकीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिमन्यू झालेले आमदार चक्रव्यूव्हात फसल्यासारखी परिस्थिती झाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय कलह वाढला आहे. 5 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी बोलवण्यासाठी दोन्ही गटाकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. एक पक्ष आणि दोन व्हीप यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभ्रमात पडले आहे. बुधवारी महाराष्ट्राचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी वांद्रे येथे बैठक बोलवली आहे, त्यासाठी प्रतोद अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. तर शरद पवार यांनी वायबी सेंटरमध्ये बैठक बोलवली आहे. त्यासाठी प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोणत्या बैठकीला जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
दोन व्हीप जारी झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मात्र सत्वपरिक्षा सुरु झाली आहे. शरद पवार साहेब की अजितदादा पवार कुणाच्या पाठिशी उभं राहायचं हा अनेकांना पेच पडला आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता अजित पवार यांनी एमईटी वांद्रे येथे पक्षाची बैठक बोलवली आहे. तर दुपारी शरद पवार यांनी वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक बोलवली आहे. आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष आणि इतर नेते कोणत्या बैठकीला हजर राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादीच्या बैठकीसाठी मुख्य प्रतोद जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप जारी केला. उद्या पक्षाची बैठक आहे तसं यासाठी सर्व आमदारांनी उपस्थित रहाण्याचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे दुपारी एक वाजता बैठकीसाठी उपस्थित राहावे, असे पत्रात म्हटलेय. जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदारांसाठी शशिकांत शिंदे यांनी व्हिप जारी केला आहे. विधान परिषदेचे एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत पाच आमदार तर शरद पवारांसोबत चार आमदार आहेत. रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे,सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत तर एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड, बाबा जानी दुरानी हे शरद पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत.



