मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत आहेत. अलीकडेच आमदार मनिषा कायंदे आणि नेते शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. यानंतर आता विधान परिषदेच्या उपसभापती असलेल्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते उपस्थित होते.
नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्य सरकारच्या कामाचे कौतुक करत आपण प्रवेश का करत आहोत, हे एका पत्रकातून सांगितले आहे. तसेच, बाळासाहेबांच्या विचारांची भूमिका घेऊन ही शिवसेना पुढे जात असून हीच खरी शिवसेना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



