मुंबई : मूर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास परवानगी दिलेली आहे, अशी घोषणा राज्य सरकारने विधान परिषदेत केली. तथापि, मूर्तीचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व महापालिकांना कृत्रिम तलाव तयार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर सरसकट बंदी घालू नये. यामुळे मूर्ती तयार करणाऱ्या कारागिरांच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना आर्थिक फटका बसेल. या उत्सवाच्या माध्यमातून राज्यात ७० ते ८० हजार कोटींची उलाढाल होते. त्यावरही परिणाम होईल, अशी भीती शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे व्यक्त केली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्याचे दिल्ली प्रदूषण महामंडळाने स्पष्ट केले आहे. गुजरात आणि हैदराबादमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरल्या जातात त्यामुळे मूर्ती तयार करण्यावर बंदी घालणे अन्यायकारक आहे.



