पुणे – राज्यात शिक्षण विभागात बढती किंवा बदली देणे, दाखल्यावरील दुरुस्त्या करणे, बडतर्फ शिक्षकांना पुन्हा कामावर रुजू करणे अशा कामांमधून गैरव्यवहार केलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांच्या मागे आता लवकरच सक्त वसुली संचालनालय (ईडी) लागण्याची चिन्हे आहेत.
राज्यातील ३२ शिक्षण अधिकाऱ्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी होत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची काही प्रकरणे ‘ईडी’ पाठविणार असल्याचा सूतोवाच फडणवीस यांनी केला.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अन्य आमदारांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहारात सहभागी शिक्षणाधिकाऱ्यांवर काय कारवाई केली, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी शिक्षण विभागातील गैरव्यवहाराची काही प्रकरणांची ईडीमार्फत चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून गैरव्यवहार होत असल्यासंदर्भात विचारलेल्या तारांकित प्रश्नोत्तरातही फडणवीस यांनी उत्तर दिले आहे.



